वाटेवरी काटे (भाग १)

“सवे ..अगं सवे..उठ की गं….संमदं उजडलयं बाहेर ,तरी अजून झोपली व्हयं????साळात जायचं नाय व्हं..नसलं जायचं तर आजच्याला तुह्या बापाची भाकर पांढरीच्या रानात घेवून जाय…”. ‘झाली इची किरकीर सुरु’ सवी मनातल्या मनात बडबडते.. सवी उठली असं समजताच आजी बाहेरुन आवाज देते . “सवे उठ..मला पानी इसणून दी…तोह्या आजानी पिताळी तांब्या कुठं ठेवला तेवढा गवसून आणून दी… ” अन सुमे पोरीला कहायला पाठवती पांढरीत भाकरी घेऊन. त्यो ओरडन ना..असं बोलत आजी नहानीत लुगडं घेऊन जाते… तेवढ्यात आजाचा आवाज देतो .” सवे ए सवे ..माझी काठी आण. मी चाललो राणात शेरडा घेऊन..तु इतीस का..चिचीच्या मळ्यात जाऊ आज..चिचा देतो तुला खायला आज. “. हा सगळा आरडाओरडा ऐकून सवी वैतागते.अंथरुणात तशीच उठून बसते..नेहमीसारखी सवी आज ही आळसलेली होती. घरच्यांवर वैतागलेली होती .पेंगुळल्यागत उजव्या पायाची तोरडी हाताने फिरवत होती.. अंगावरची गोधडी बाजूला करत ती अंगावरला फ्रॉक सावरते अन विस्कटलेल्या केसांवरुन हाथ फिरवते…

सवीचं गाव पिंपळगाव. अगदी छोटं खेडं. गावातले रास्ते म्हणजे ओबडधोबड वर खाली, दगड धोंडे असलेले. रस्त्यावर नुसता फुफाटा. रस्त्याच्या कडीनं हिरव्यागार बाभळीच्या रांगा .वेशितनं आत गेलं की मुख्य गाव लागायचं..गावात विठ्ठलाचं मंदीर होतं. मंदिरात रोज राञी आरत्या ,अभंग,हरिपाठ म्हणायला गावकरी जमा होत. मंदीरामागं माठं पटांगण होते. त्या पटंगणात दर शुक्रवारी बाजार भरे. गावातनं थोडं पुढं गेली की शाळा होती ..सविचं घर त्याच दिशेला होतं. गावाच्या डाव्या बाजूला थोड्या आंतरावर एक ओढा होता .ओढा तसा नेहमी कोरडाच असायचा. ओढ्याच्या पलीकडं बर्याच वसत्या होत्या .ओढ्याच्या काठी उंचवट्यावर मोठं वडाचं झाड होतं. त्या शेजारीच दगडी ओटा बांधलेला होता. ओट्यावर म्हसोबा म्हणून भला मोठा दगड शेंदूर फासून रोवलेला होता. जञेच्या वेळी गावकर्यांची चांगलीच गर्दी जमायची..

सवीचं सपर दोन खोल्यांचं. चुल्हीची खोली जरा तुटकच होती. सप्रा समोर मोठं डेरेदार लिंबाचं झाड होतं. सारवलेल्या अंगणात एका कोपर्यात तिन दगडाची चूल मांडलेली होती .आंघोळीचं पाणी त्यावर तापे. त्याच्या शेजारीच नहानीघर होतं.बारदाना अन जुन्या साड्या गुंडाळून आडोसा केला होता.

सवी डोळे चोळत अंथरुणात अजूनही तशीच बसून होती. तेवढ्यात मागनं तिची आई पाठीत धपाटा देते. ” अगं ये सवे उठ..कव्हर बसती “. ए आये कामून उग्गच मारतीस .मी आज काई करणार नाय, अन साळात. बी जाणार नाय..मी चालले आजाबरोबर चिचीच्या मळ्यात..हे ऐकून आजा सप्राच्या दारात काठी टेकत टेकत येतो. सप्राचं कवड उघडून सवीला म्हणतो __”चाल बाय चल ,आवर पठदिशी ..तोपवतर शेरडा सोडतो .”.सवी लगीच उठते अन बाहेर जाऊन काळ्या डब्बीतनं हातावर मिसरी घेते ..ति बाहेर येताच त्यांचा कुञा मोती शेपटी हालवत तिच्या पायापाशी घुटमळतो .. “मोत्या व्हयं बाजूला ,आजा बरोबर चिचीच्या मळ्यात जायचं हाय. उशिर व्हतोय मला “.. असं बोलून ती नहानीत जाते अन आजीनं आंघोळीला घेतलेलं पानी स्वतः आंगावर भडाभड ओतून घेते .”आजे माझी फराक आण गं..वळणीवर हाय बघ… तुला काय कापडं घेऊन आंघोळीला बसता येत नाय व्हयं…मोठी झाली ना आता..अन अंगभर कापडं घाल , आपरा फराक घालू नगस.…केसांला तेल लाव अन चापूनचुपून वेण्या घाल ,नायतर मी देते घालून ” आजीची सुरु झालेली वटवट सवीला ऐकवत नाही…..ती जोर्यात ओरडते..”आजे एका रातीतच मोठी झाले का गं मी ?? जव्हा पाव्हं तव्हा कापडांवरुन ओरडत असतीस”…. ‘ए गप्प गं घाल हा फराक अन थोबाड गप्प कर.’ सवीची आय तिला खेकसते…

‘सवे आवर, तोह्यावाली साळाची मिञीण आली बघ…’सवी आयकडं रागानं पहाते अन जटका मारुन आयच्या हतातनं फराक ओढून घेते. ‘सवे आज कामून गं उशिर केला’ मनी विचारते…मनी म्हणजे सवीची जिवलग मैञीण . “काय नाय गं ..घरच्यांला वैतागले बघ.सगळ्यासनी सोडून लांब निघून जावसं वाटतयं बघ..मी उठल्यापासून सार्यांचं थोबाडं सुरु होतं “. “मनी आली व्हयं गं,मग नाय येत का चिचीच्या मळ्यात ?? तु येणार म्हून सार्या शेरडा सोडल्या व्हत्या म्या..बरं जा मग साळात..आणिन म्या तुला चिचा” आजा पडक्या स्वरात बोलतो. सवी बरोबर असली की आजाला भारी वाटायचं..सार्या नातवंडामध्ये सवी लाडाची होती. सवीला पण आजाचा लळा होता. आजा म्हणजे तिच्या हक्काचं माणुस…

सवी गंध पावडर करते. आय तिच्या दोन वेण्या घालते. सवी स्वतःला आरशात निरखून पहाते..स्वतःला आरशात पाहून ती गालातल्या गालात हसते.काजळ घातल्याने तिचे टपोरे डोळे अजूनच चमकु लागले होते. दोन्ही भुवयांमध्ये चॉकलेटी गंध शोभून दिसत होता. टोकदार नाकामध्ये खड्याची मुर्णी उठूध दिसत होती.. ” सवे लय नको फुटक्या आरशात पाहु, तोआंड. फुटनं “. तुझं नी आजीचं कामून नाय फुटलं गं अजून…सवी आयकडं रागानं पाहून ओरडते. “लय अबुचर पोरगी हाय…सदानकदा मोठ्याल्या माणसांनला उलट बोलती..आघाऊ काट्टी….” आजी तोंड वाकडं करुन बोलते.. सवे साळाला उशिर व्हतोय..चल लवकर…नायतर गुरुजी वर्गा बाहेर उभा करीन.. मने डबा भरते , थांब जरा…आये आज पण त्येच का , भाकरी अन मिरचीचा ठेचा..सवी वैतागते.. फडक्यात एक भाकर अन मिरची घेऊन त्यावर तेलाची धार टाकते. शाळेत जायला आज पण उशिरच झाला होता. गुरुजी आज बाहेर उभा करतो की काय असं दोघींना वाटु लागतं..त्या पळतच शाळेत जातात..कशाबशा वेळेच्या आत शाळेत जाऊन पोहचतात.. .दोघी धापा टाकत होत्या. घामाने डबडबल्या होत्या. तशाच त्या वर्गात जाऊन बसतात.. थोड्यावेळात गुरुजी वर्गात आले. आल्या आल्या गुरुजींनी सगळीकडं नजर फिरवली. दोन रांगा पोरांच्या अन एक रांग पोरींची होती. सवी मुलींच्या रांगेत पाहील्याच बाकडावर बसली होती. सवी वर्गात नेहमी पहीली असायची..आभ्यासत हुशार..खुप चिकित्सक अन मेहनती होती..सार्या गुरुजींनी तिचे फार कौतुक वाटायचे..

गुरुजीनं शिकवलेलं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती प्रश्न विचारत रहायची..इंग्रजीचा वर्ग सुरु झाला..एक एक करुन गुरुजीनं सगळ्याना वाचायला लावले .सवीपासून सुरुवात झाली.तिनं वाचायला सुरुवात केली..वाचता वाचता तिचं काहीतरी चुकतं. अन वर्गात हशा उडाला..सम्या जरा जास्तच हसला होता.
पोरांच्या दिशेनं पाहून सवी सम्यावर ओरडते.  ए वांड ,काय झालं रं तुला हसायला…तुला येतं का वाचता?? दात काढतोस..गुरुजी सवीकडं पाहून डोळे वटारतात..”.सवे मुलीच्या जातीला अस्सं बोलणं शोभतं व्हयं.. सांगु का तोह्या बापाला..”. गुरुजी मुलाची जात वेगळी अन मुलीची वेगळी असं असतं व्हयं.. आधीच एवढ्या जाती अजून कहायला हाव्यात नसत्या जाती..।
‘सवे उलटं बोलु नको ..’ गुरुजी दराडतो…वर्ग चिडीचुप होतो… सवी एका दमात धडा वाचून काढते..गुरुजी तसेच खालचा ओठ दाताखाली दाबून सवीकडं रागाने पहात रहातात…” बेअक्कल कुठली, हुशार हाय म्हूण नुसती बोलत रहाती ” गुरुजी मनातल्या मनात सवीला बोलतो…
      पाटलाचं पोर सवीच्याच वर्गात होतं..त्याचं नाव दिनेश..रोज सायकलनं शाळेत ये जा करत होता..दिन्या स्वभावनं भोळसट अन अबोल होता. पाटलाचं पोरगं असलं तरी शाळेत पाटीलकी त्याने गाजवली नाही. पैशाचा माज दाखवला नाही की फुशारकी केली नाही.. वर्गातला राजु त्याचा जिवलग मिञ.. शाळा सुटते ..सवी अन मनी घरी निघतात. पाटलाचा दिन्या पण दोघींमागे निघातो..त्याचं हे रोजचं असायचं. ..”मने हे येडं काय गं रोज आपल्यामागे येतो.. ” येडं कसलं गं,  शांत आहे बिचारा…त्याचं घर रस्यातचं हाय नागं ,आधी त्याचं घर मग तुहं अन मग माह्यावालं..बिचारा दिन्या ,तु त्याला बी सोडु नगं.. ” अगं सायकल हाय त्याच्याकडं ,पैंडल मारुन जावं की भुरकून निघून..येड्यागत चालतं आपल्या मागून सायकलला धरुन ..येडं बेनं कुठलं “

  पाटलाच्या घरी रस्त्याच्या कडेला मोठ्ठ बोरीचं झाड होतं..झाडाला बोरं लागली की दोघींचे पाय आपोआप बोरीखाली थबकायचे. दिन्या पण त्यांना बोरं उचलू लागायचा. .उचललेली बोरांची ओंजळ  माञ तो सवीच्या पिशवीत टाकायचा….दिन्या ,मनीला बी द्येत जा ना ,मलाच काय द्येतो.. नेहमीप्रमाणे दिन्या तिच्याकडं तिरक्या नजरेत पहातो. ,काही न बोलता ओठावर हलकं हसु चढवून निघून जातो…

आजा शेरडा घेऊन घरी आला होता. तंबाखू चघळत बसला होता. आजी शेरडांना पाणी पाजत होती. आय झाडून घेत होती. ” आजा, पिंट्या अन बंड्या कुठं हाय ” सवी लांबनच आवाज देवून विचारते.. असतीन घरात ..मनीला बोलिव चहा पेयला..मने ए मने ये चहा पेयला .आजा मनीला हात वर करुन बोलवतो.. “नगं, नगं आज., उशिर झाला हाय ..घरी जाऊन गुरांचं करायचं हाय..”मनी सांगते. सवे उंद्या लवकर आवरुण ठयेव, पळत जावं लागतं मग ..व्हयं गं ,ठेवीन आवरुण ,जाऊ रमत गमत..

To b continued………. Meena Shete….❣️

Design a site like this with WordPress.com
Get started